फायली जळाल्या; डिजिटल रेकॉर्ड सुरक्षित   

ईडीचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : दक्षिण मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) आगीत फर्निचर आणि फायली जळाल्या असल्या तरी डिजिटल रेकॉर्ड सुरक्षित आहे. त्यामुळे, कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीत किंवा तपासणीत कोणताही अडथळा येणार नाही, असे ईडीच्या अधिकार्‍यांंनी सोमवारी  सांगितले.बल्लार्ड इस्टेट परिसरातील कैसर ई हिंद इमारतीत ईडीचे कार्यालय आहे. ही इमारत पाच मजली असून रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ईडीच्या कार्यालयास आग लागली. पॉवर बॉक्समधील शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. तर, ईडीचे अधिकारी आगीत नेमके काय-काय जळून खाक झाले, हे तपासत आहेत.
 
दरम्यान, ईडीकडून प्रत्येक कागदपत्राचे आणि फायलींचे डिजिटल रेकॉर्ड जतन केले जाते. आगीत फायली जळाल्या असल्या तरी डिजिटल रेकॉर्ड सुरक्षित आहे, असे ईडीने निवेदनात म्हटले आहेत. बहुतांश प्रकरणांची कागदपत्रे न्यायालयात आहेत, असेही ईडीने म्हटले आहे. आर्थिक अफरातफर प्रकरणासह अन्य कोणत्याही प्रकरणांचा तपास करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, असेही ईडीने सांगितले.
 

Related Articles